पूर्णा (परभणी) : तालुक्यातील कानेगाव येथील एक महिला शहरातील रुग्णालयामध्ये आली असताना तिला शासकीय पगार व धान्य मिळणार असल्याचे आमिष दाखवून सदर महिलेची २६ हजार रुपये किमतीचे दागिने दोन भामट्यांनी लंपास केल्याची घटना मंगळवारी (दि.१४) घडली. याप्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात ठाण्यात दोघा भामट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील कानेगाव येथील महिला सखुबाई एकनाथ दंडवते ही मंगळवारी (दि.१४) शहरातील एका रुग्णालयात आली होती. दरम्यान, रुग्णालयामध्ये ती गेली असता तिला दोन अज्ञात अनोळखी इसम भेटले. त्यांनी त्या महिलेला तुम्हाला शासकीय पगार व धान्य मिळणार आहे. तुम्ही आमच्यासोबत कार्यालयामध्ये चला, असे बोलून त्या महिलेशी जवळीक साधली. जवळीक साधून त्या महिलेला एका दुकानाजवळ बसून घेतले व त्या महिलेच्या हातातील चांदीचे दागिने, सोन्याची पोत असा एकूण २६ हजार रुपये किमतीचे दागिने काढून ते लंपास केले व ते दोन्ही भामटे पसार झाले.
दरम्यान, या प्रकरणी सदर महिला अद्यापही आपण दागिने दिलेले इसम आले नाहीत. त्यामुळे कानेगाव येथील एक महिला भेटली व त्या महिलेला विचारणा केली असता सदर महिलेने सांगितले की, हे शासकीय कार्यालय नसून हे रुग्णालय आहे. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सखुबाई एकनाथ दंडवते (रा.कानेगाव) या महिलेने पूर्णा पोलीस ठाणे गाठून झालेली हकीकत पूर्णा पोलिसांना सांगितली. दरम्यान, पूर्णा पोलिसांनी सदर महिलेच्या जबाबावरून दोन अज्ञात भामट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पूर्णा पोलीस करीत आहेत.