हिंगोली: तालुक्याअंतर्गत येणाऱ्या ब्रह्मपुरी येथे सोमवारी (दि.१३) झालेल्या अवकाळी पावसात बैल जोडी दगावल्याची घटना घडली. दरम्यान, याच दिवशी औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव सोळंके येथे एक म्हैस वीज पडून दगावली आहे.
हिंगोली तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे विजांच्या कडकडाटात वीज कोसळून शेतकरी दत्तराव गजानन लोकडे यांची बैलजोडी दगावली. ऐन शेती हंगामात शेतात असलेली बैलजोडी ठार झाल्यामुळे शेतकऱ्याला मोठी अडचण निर्माण झाली आहे. सध्या उन्हाळी मशागतीची कामे सुरू असताना घडलेला हा प्रकार शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरला आहे. गेल्या ८ दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांनी १ लाख १० हजार रूपयांना बैलजोडी विकत घेतली होती. परंतु वीज पडून ही बैलजोडी ठार झाल्यामुळे शेतकऱ्याच्या कामाला मोठा अडथळा आला आहे.
त्याच दिवशी रात्री ८.३० वाजता तलाठी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी केसापूर येथील शेतकरी नेते तथा बाजार समितीचे संचालक रमेश शिंदे, दत्तराव लोकडे, शिवाजी लोकडे, गजानन तावरे, कान्हा सावळे, अनिल शिंदे उपस्थित होते. रात्रीच तलाठी श्रीमती राहाटकर यांनी पंचनामा करून हिंगोली तहसील कार्यालयास कळविले. औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव सोळंके येथे देखील एका शेतकऱ्याच्या शेतात बांधलेली म्हैस दगावली आहे.
येथील संजय सखाराम वाघमारे यांच्या मालकीची ही म्हैस ठार झाल्यामुळे त्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी येवून तलाठी जायभाये यांनी पंचनामा केला. यावेळी सरपंच दिलीप मुदनर, शेतकरी प्रकाश सोळंके, रामचंद्र घोंगडे, सटवाराव कराळे, नवनाथ वाघमारे, म्हैस मालक सखाराम वाघमारे, हे उपस्थित होते. एकूणच हिंगोली जिल्ह्यात ब्रह्मपुरी व येहळेगाव सोळंके अशा दोन ठिकाणी जनावरे दगावल्याच्या घटना घडल्या.