हदगाव : आई आणि पुतणीला सोयाबीन काढणीच्या कामाला सकाळी दुचाकीवर शेतात घेऊन जाताना अचानक दोन वानरांनी दुचाकीवर उडी मारली. त्यात दुचाकी पडून तिघेजण जखमी झाल्याची घटना रविवारी (दि. २९) शिरड (ता. हदगाव, जि. नांदेड) येथे घडली. ग्रामीण भागात सध्या सोयाबीन काढणीचे काम सुरू असून सोयाबीन काढणीसाठी महिला व पुरुष सकाळी लवकरच शेतात जात आहेत.
शेत दूर असल्याने आचल कलाने हे त्यांची आई व पुतणीला घेऊन दुचाकीने शेतात जात असताना गावाच्या बाहेर निघाले. अचानक दोन वानरे समोर आली व त्यांनी थेट दुचाकीवर उडी मारल्याने दुचाकी पडून तिघे जण जखमी झाले. ही घटना गावाजवळ घडल्याने ग्रामस्थ धावून आले आणि त्यांना उपचाराकरिता दवाखान्यात घेऊन गेले.
शिरड येथे वानरांच्या दोन टोळ्या गावात असून त्यांनी धुमाकुळ घातला असून एक दीड वर्षात वानरांनी सात ते आठ जणांवर हल्ला करून जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत. वानरे घरात शिरून दुरडीतील भाकरी पळवतात. लहान मुले व महिलांवर धावून जाण्याचे प्रकार वाढल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने या वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी परीसरातील ग्रामस्थांनी केली आहे.