छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कन्नड तालुक्यातील हतनूर येथील आध्यात्मिक शिक्षणासाठी आश्रमात राहाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर आश्रमचालकानेच बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही घटना २० ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी आरोपी विरोधात कन्नड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादासाहेब पुंडलिक अकोलकर ऊर्फ दादा महाराज अकोलकर (वय-67) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्नड तालुक्यातील हतनूर येथे गेल्या दहा वर्षांपासून आध्यात्मिक शिक्षण, वादन, गायनाचे प्रशिक्षण देण्यासाठी आश्रम चालवण्यात येते. या आश्रमातील मुली जवळच्या एका शाळेत शिक्षण घेण्यासाठी जात असे. शाळा सुटल्यानंतर रोज आश्रमात परत येतात.
एके दिवशी रात्रीच्या वेळी आश्रमचालक दादासाहेब अकोलकर याने दोन अल्पवयीन मुलींना आपल्या खोलीत बोलावून मुलींच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत, लैंगिक अत्याचार केला. त्याशिवाय, या प्रकाराबाबत कोणास काहीही सांगितले तर आश्रमातून हाकलून देण्याची धमकी मुलींना दिली आहे. पीडित मुलींकडे मोबाईल नसल्यामुळे आणि आश्रमात आश्रमचालक यांची दहशत असल्याने दोन दिवस त्यांनी या घटनेविषयी कोणाला काहीही सांगितले नाही.
दरम्यान, पीडित मुलींच्या पालकांनी आज आश्रमात येऊन आश्रमचालक दादा महाराज यांना जाब विचारला. मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. याप्रकरणी पीडित मुलींच्या फिर्यादीवरून याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे.