उजनी (जि. लातूर): गावाजवळ असलेल्या शेतामध्ये नारळ आणण्यासाठी आपल्या मित्राला बरोबर घेऊन गेलेल्या दोघा मित्रांनी कत्ती, विळा पोटात खुपसून खून केल्याची घटना औसा तालुक्यातील कमालपूर येथे शनिवारी (दि. ११) घडली. विशेष म्हणजे, खून केल्यानंतर दोन्ही अल्पवयीन आरोपी हे नातेवाईक मृतदेह शोधत असताना त्यांच्यासोबतच होते, नेमकी ही घटना कशामुळे घडली याबाबत गावात वेगवेगळी चर्चा सुरु आहे.
औसा तालुक्यातील कमालपूर येथे मयत रितेश विरेंद्र गिरी (वय १४) हा मुलगा आपल्या मित्रांसोबत नारळाच्या शेतामध्ये नारळ आणण्यासाठी गेला होता. मात्र, त्याच्या दोन मित्रांनीच त्याच्या पोटात कत्ती, विळा खुपसून खून केला. घटना समोर येऊ नये म्हणून त्या दोघांनी मृतदेह हा सोयाबीन गुळीच्या ढिगाऱ्याखालीच लपवून ठेवला. रात्री उशिरापर्यंत रितेश हा घरी परतला नसल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध सुरु केला. रविवारी सकाळीही त्याचे शोधकार्य हे सुरुच होते.
दरम्यान, रितेशचे दोन मित्रही नातेवाईकांसोबत त्याचा शोध घेत असल्याचा बनाव करीत होते. त्या दोघांनीही नेमके काय झाले याचा उलगडा होऊ दिला नाही. मात्र, ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये नारळाची झाडे होती, त्यांनी या दोन अल्पवयीन मुलांना बोलावून घेतले. रात्री तुम्हीच नारळ घेण्यासाठी शेतामध्ये आला होतात का, याची विचारणा केली. दोघेही टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या शेतकऱ्याने मी कोणाला काही सांगत नाही. शेतामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असल्याने सर्व घटना यामध्ये कैद झाली आहे. त्यामुळे तुम्ही काय केले, रितेश कुठे आहे? अशी विचारणा केली असता, त्या दोघांनी सर्व घटनाक्रमच सांगितला.
तिघेजण हे नारळ घेण्यासाठी शेतामध्ये आले होते. किरकोळ भांडणातून हे कृत्य झाले असले तरी यामागे नेमके कारण काय याचीही चर्चा होऊ लागली आहे. त्यातील एक आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतला असून एकजण फरार असल्याची माहिती मिळत आहे. मयत रितेश गिरी याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उजनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणण्यात आले होते. रविवारी रात्री उशिरापर्यंत नातेवाईकांनी रितेशचा मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. गावामध्ये तणावाचे वातावरण असून राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी दाखल झाली आहे.
खून करूनही आरोपी मृतदेहाच्या शोधात
शनिवारी रात्री दोन्ही अल्पवयीन आरोपीनी रितेश गिरी याचा धारदार शस्त्राने खून केला. त्यानंतर मृतदेह सोयाबीन गुळीच्या ढिगाऱ्याखाली लपवलाही. एवढेच नाहीतर रविवारी सकाळी रितेशचे नातेवाईक हे त्याचा शोध घेत होते. त्यावेळी दोन्ही आरोपी आपणही शोधकार्य करीत असल्याचे भासवित होते. घटनेबद्दल आपल्याला काहीच माहित नाही असा ते अविर्भाव आणत होते, मात्र, शेतकऱ्याने त्यांच्यावर संशय घेतला आणि सर्व घटनाच समोर आली.