कन्नड (छत्रपती संभाजीनगर) : येथील महावितरण उपविभागाचे कार्यकारी अभियंता धनाजी रामगुडे व याच कार्यालयातील उपव्यवस्थापक प्रवीण दिवेकर यांना तक्रारदार यांनी केलेले कामाचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तीन लाख ५० हजार रुपयांची मागणी करून यापूर्वी दीड लाख रुपये घेतले होते. तर उर्वरित दोन लाख रुपयांसाठी तडजोड करून एक लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. ही रक्कम स्वीकारताना बुधवारी (दि.१०) दुपारी एकच्या सुमारास दोन्ही आरोपींना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कन्नड विभागीय कार्यालयात त्यांच्या कक्षातच ही कारवाई करण्यात आली. लाच स्वीकारताना आरोपी धनाजी रामगडे (५४) व प्रवीण कचरू दिवेकर (वय ४०) यांना लाचेच्या रकमेसह छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
सदर कारवाई छत्रपती संभाजीनगर विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव पोलीस उप अधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक अमोल धस, पोलिस अंमलदार युवराज हिवाळे, रवींद्र काळे, आत्माराम पैठणकर, चालक बागुल यांच्या पथकाने केली आहे. या प्रकरणी कन्नड शहर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.