लातूर : चाकूर तालुक्यातील महाळंगी शिवारात दोन मित्रांच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महाळंगी परिसरात रविवारी सायंकाळी अचानक चक्रीवादळ, विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या वादळातच दोन तरुणांच्या अंगावर वीज पडल्याची घटना घडली. या घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिवाजी नारायण गोमचाळे (वय-३८) आणि ओमशिवा लक्ष्मण शिंदे (वय-३५) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नवे आहेत. दोन विवाहित तरुणांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या महिनाभरापासून या भागात वादळी वारे आणि अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. रविवारी सायंकाळी अचानक आलेल्या चक्रीवादळ आणि अवकाळी पावसाने महाळंगी शिवाराला चांगलाच तडाखा बसला आहे. शेतात कामासाठी गेलेले शिवाजी गोमचाळे आणि मोलमजुरी करुन आपल्या घर प्रपंच भागविणारे ओमशिवा शिंदे हे दोघे चक्रीवादळ तसेच अवकाळी पावसात शेतकरी शिवराज राजेसाहेब सोळुंके यांच्या गट नंबर २७३ मधील शेडमध्ये बसले होते. मात्र, चक्रीवादळात शेडवरील पत्रे उडल्याने दोघेही दुसऱ्या शेडकडे पळत जात असताना अचानक दोघांच्या अंगावर वीज पडली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, आज झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसात तीन जनावरे दगावली आहेत. जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ, निलंगा व लातूर तालुक्यात प्रत्येकी एक जनावर दगावले आहेत. या जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली आहे.