अकोला : नाकात तुरीचा दाणा गेल्यामुळे अकोल्यात तीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. अकोल्यातील पाटसूल येथे ही घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. मुलाला रुग्णालयात नेण्यात आले पण, काही उपयोग झाला नाही, अर्ध्या रस्त्यात योगिराज इसापुरे या चिमुकल्याचा मृत्यू झाला.
नेमकं काय झालं होतं ?
घरात आजी तुरीचे दाणे काढत होती, त्यावेळी त्यांचा नातू योगिराज इसापुरे हा आजीजवळ आला. आजीने काढून ठेवलेले तुरीचे दाणे त्या चिमुकल्याने मुठीत घेतले आणि तोंडात कोंबले. त्यातील एक दाणा मुलाच्या नाकात गेला. त्याला लगेच श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तो तडफडत असल्याचे पाहून कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात भरती करण्याचा प्रयत्न केला. परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला. अकोल्यातील दहीहंडा पोलिस स्टेशनच्या परिसरात 23 जानेवारी रोजी रात्री ही घटना घडली. पोलिसांनी अपघाती निधनाची नोंद केली आहे.
धावपळीच्या जीवनात सतर्कतेची गरज
सध्या नोकरी आणि इतरही कामांमुळे सर्वांचेच आयुष्य धावपळीचे झाले आहे. महिला देखील घरातील आपले काम करुन जॉब करत असतात. मात्र अशात लहान मुलांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. घरातील काम करत असताना किंवा मोबाईलमुळे मुलांकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे पालकांनी वेळीच या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे वारंवार अशा घटनांमधून समोर येत आहे.