धाराशिव: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दरबारात भाविकांना चक्क पुजाऱ्याकडून बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली. त्याशिवाय, पुजारी आणि त्यांच्या साथीदारांनी भाविकांच्या गाडीची तोडफोड केली. त्यामुळे तुळजाभवानीच्या दरबारात पुजाऱ्यांच्या मुजोरीची बाब पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. नाशिकचे राजेंद्र पिंगटे यांना या घटनेला सामोरे जावे लागले. तुळजापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमक काय घडलं?
नाशिक येथील भाविक कुटुंबीयांसह तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आले होते. घाटशीळ रोडवर एजंटाने त्यांना 751 रूपयांत डायरेक्ट दर्शन देण्याचे आमिष दाखवले. त्या एजंटने त्यांना मंदिरात दर्शन रांगेत ऊभे केले. नंतर त्याने पळ काढला. दुसरीकडे थेट दर्शनाच्या नावाखाली भाविकांकडून पैसे घेतले. मात्र, दर्शन झाले नसल्याने भाविकाकडून विचारणा करताच पुजाऱ्यांनी त्यांना मारहाण केली. विशेष म्हणजे त्यांच्या चारचाकी वाहनाच्या काचा फोडल्या.
जाब विचारल्यानंतर मारहाण
दर्शन झाल्यानंतर ज्यांचा मोबाइल क्रमांक दिला होता, तो पुजारी आलाच नसल्याचं पिंगटे कुटुंबाच्या लक्षात आले. एका तासाच्या प्रतीक्षेनंतर दुसऱ्याच पुजाऱ्याने आरती करून मुखदर्शन घेऊन दिले. नंतर पिंगटे यांनी एजंटाला विचारणा केली असता एंजटाकडून भाविकांस मारहाण करण्यात आली. सोबतच्या महिलांनाही छेडले गेले, मुलांच्या डोक्यात खोऱ्या, पाटी घालून मारम्यात आले. या मारहाणीत भाविकांचे दागिनेही चोरीला गेल्याचे बोलले जात आहे. पाच-सहा जणांनी बेदम मारहाण करून भाविकांच्या इर्टिगा कारच्या काचा फोडल्या.
तुळजापुरात घाटशिळ रोड वाहनतळावर थेट दर्शनच्या नावाखाली भाविकांना फसवण्याचे प्रकार सतत सुरू असून मंदिर समिती याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भाविक करत आहेत. तर मंदिर समिती ही स्थानिक पुजाऱ्यांच्या दहशतीखाली असल्याचे समोर येत आहे.