छत्रपती संभाजीनगर : नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावर टोलचा ‘झोल’ सुरूच आहे. सोमवारी (दि. ४) काही ठिकाणी फास्टॅगवरून टोलची रक्कम कपात होत नसल्याने वाहनधारकांना अडचणींना सामोरे जावे लागले. वेगवान प्रवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर टोलमुळे अनेकदा अडचणी येत आहेत. मात्र, रस्ते विकास महामंडळाकडून याची दखल घेतली जात नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत.
वैजापूरहून छत्रपती संभाजीनगरला येणाऱ्या काही वाहनधारकांचे फास्टॅग महामार्गावर चालत नव्हते. वाहनधारकांनी क्रेडिट कार्डवरून रक्कम देण्याची तयारी दर्शवली मात्र, त्यास नकार देण्यात आला. अखेर महामार्गावरून बाहेर पडताना रोख रक्कम घेण्यात आली. फास्टॅग बंद असल्यास क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरून टोल घेतला जावा, अशी वाहनचालकांची अपेक्षा आहे. मात्र, त्याकडे डोळेझाक केली जात आहे. समृद्धी महामार्गावरून ताशी १२० कि. मी. वेगाने जाण्याचा अनुभव वाहनचालक घेत आहेत. प्रवासाच्या वेळेत यामुळे मोठी बचत झाली आहे, परंतु टोल भरण्यासाठी काही ठिकाणी खोळंबावे लागत असल्याने प्रवाशांना मनस्ताप होत आहे.