Tirupati Flight : गोंदिया : गोंदिया येथील बिरसी विमानतळावरुन आता बंद झालेली तिरुपती विमान सेवा पुन्हा सुरू होणार आहे. 13 मार्च 2022 पासून सुरू झालेली प्रवासी वाहतूक सेवा अवघ्या सहा महिन्यांतच बंद पडली होती. त्यानंतर आता इंडिगो कंपनीने या विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवा करण्याचे कंत्राट घेतले आहे. तब्बल दहा महिन्यांच्या कालावधीनंतर उद्यापासून गोंदिया–हैदराबाद –तिरुपती विमानसेवेला प्रारंभ होणार आहे.
इंडिगोच्या विमानसेवा प्रचंड प्रतिसाद
तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांनी संख्या पाहता, देवदर्शनाकरिता जाणाऱ्या प्रवाशांसाठी ते सोयीचे होणार आहे. उद्या दुपारी 12:30 मिनिटांनी बिरसी विमानतळावरून इंडिगोचे विमान हैदराबाद आणि तिरुपतीसाठी उड्डाण घेणार आहे. यासाठी अनेक प्रवाशांनीसुद्धा तिकीट बुक केले आहे. सर्वाधिक तिकिटांची बुकिंग ही तिरुपतीसाठी झाली असल्याचे इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
अशी असणार विमानसेवा
बिरसी विमानतळ प्राधिकरणाने आवश्यक सोयीसुविधा व प्रक्रिया पूर्ण केली आहे. या विमान प्रवासाचे अंदाजे भाडे तीन ते साडेतीन हजार रूपये असणार आहे. ही विमानसेवा सातही दिवस उपलब्ध असणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.पहिल्या टप्प्यात इंडिगो कंपनीने गोंदिया-हैदराबाद-तिरुपती अशी प्रवासी वाहतूक सेवा बिरसी विमानतळावरून सुरू होणार आहे. त्यामुळे बिरसी विमानतळावरून प्रवाशांना थेट हैदराबाद आणि तिरुपतीसाठी उड्डाण घेता येणार आहे. तर गोंदिया येथून तिरुपतीला जाण्यासाठी विमान बदलण्याची गरज नसून बिरसी विमानतळावरून हैदराबादला जाणारेच विमान पुढे तिरुपतीला जाणार आहे.