नांदेड: नांदेडमध्ये दारुड्या मुलाच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून आईने आपल्याच मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना भोकर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धावरी गावात घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे. बालाजी राऊत असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी दारू पिऊन सातत्याने घरात त्रास द्यायचा. त्याच्या त्रासाला वैतागून गेलेल्या जन्मदात्या आईनेच धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीही तो नेहमीसारखा दारु पिऊन आला होता. त्यानंतर तो आईशी वाद घालायला लागला. या वादात त्याने आईला मारहाण केली. तेव्हा संतापलेल्या आईने धारदार हत्याराने त्याच्यावर वार केले. या हल्ल्यात बालाजीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी मृत तरुणाच्या भावाने पोलिसांत तक्रार दिल्यावर पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.