Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन एटीएम फोडून अंदाजे 38 लाखांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची माहिती समोर येत आहे. कन्नड तालुक्यातील चापानेर आणि वैजापूरमध्ये दोन एटीएम फोडण्यात आली. विशेष म्हणजे हे दोन्ही एटीएम एकाच रस्त्यावर आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चापानेर येथील एसबीआय बँकेच्या एटीएममधून 22 लाख आणि वैजापूरच्या आयडीबीआय बँकेच्या एटीएममधून 16 लाख चोरीला गेल्याची माहिती आहे. या दोन्ही घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
सीसीटीव्हीवर ब्लॅक स्प्रे मारला…
कन्नड तालुक्यातील चापानेर आणि वैजापूरमध्ये एकाच रात्री दोन एटीएम फोडल्याने खळबळ उडाली आहे. हे दोन्ही एटीएम एकाच मार्गावर असल्याने, एकाच टोळीने ही चोरी केल्याचे बोललेले जात आहे. विशेष म्हणजे एटीएममध्ये प्रवेश करताना चोरट्यांनी ओळख लपवण्यासाठी सुरुवातीला सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारला. त्यानंतर आतमध्ये प्रवेश करत गॅस कटरने दोन्ही एटीएम कापले. दोन्ही एटीएममधून अंदाजे 38 लाख रुपये पळवल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच बँक अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले. तर, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.