धाराशिव : धाराशिवमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटच्या मुलानेच जन्मदात्या बापाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. भुम तालुक्यातील आंतरगाव येथे ही घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण आंतरगाव सुन्न झालं आहे. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपाला अटक केली आहे. विजय उर्फ बोधीराम विक्रम गोरे असं आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत आवळल्या मुसक्या
पोलीस आरोपी विजयला अटक करण्यासाठी गेले होते, तेव्हा त्याच्या हातात लोखंडी शस्त्र होतं. पोलिसांना बघून आरोपी हे शस्त्र घेऊन त्यांच्या दिशेने धावून आला होता. नंतर त्याने त्या ठिकाणाहून पळ काढला. पोलिसांनी सिनेस्टाईल तीन ते चार किलोमीटरचा पाठलाग करुन आरोपीला पकडून बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, आपण रागाच्याभरात वडिलांची हत्या केली असल्याची कबुली देखील आरोपीने पोलिसांना दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय हा आपल्या वडिलांसोबत आंतरगाव येथे राहत होता. 8 ऑगस्ट रोजी विजयाचा त्याच्या वडिलांसोबत शुल्लक कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्याच क्षणी विजयने आपल्याच वडिलांना संपवण्याचा निर्णय घेतला. त्याने रागाच्याभरात आपल्याच वडिलांची हत्या केली.
यानंतर गुन्हा लपवण्यासाठी आरोपी विजयने त्याच्या वडिलांचा मृतदेह नदीत फेकून दिला. मात्र, दोन दिवसानंतर ही घटना समोर आली. यानंतर पोलिसांनी आरोपी विजयला अटक केली आहे. विजयने आपल्याच वडिलांची हत्या का केली, नेमकं काय घडलं ? याची चौकशी पोलीस करत आहेत.