छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दारू पिऊन पत्नीला मारहाण का करतो? म्हणून दोन भावात टोकाचे वाद झाले. या वादातून छोट्या भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात लाकडी दांड्याने वार करून त्याचा खून केल्याची घटना घडली आहे. करमाड पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करत लहान भावाला ताब्यात घेण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कुंभेफळ येथे शुक्रवारी (दि.१३) रोजी दुपारी हा प्रकार घडला आहे. सुनील सुनील भाऊसाहेब पवार (३४, रा. कुंभेफळ, ता. छत्रपती संभाजीनगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर राजू ऊर्फ नंदकुमार पवार (३२, रा. पठार देऊळगाव, ता. बदनापूर) असे आरोपी भावाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत सुनील पवार हा आपल्या पत्नीसह राहत होता. पठार देऊळगाव येथून वर्षभरापूर्वीच तो कुंभेफळ येथे राहण्यास आला होता. तसेच तो शेंद्रा एमआयडीसीत कंपनीत कामाला होता. गुरुवारी त्याचा भाऊ राजू ऊर्फ नंदकुमार पवार हा त्याच्या घरी मुक्कामी होता. यावेळी सुनील पवार हा दारूच्या नशेत असताना त्याने त्याच्या पत्नीला मारहाण केली. यामुळे त्याची पत्नी ही गुरुवारी रात्री छत्रपती संभाजीनगर शहरात सासऱ्याच्या घरी निघून गेली.
या घटनेनंतर दोन्ही भाऊ एकटेच घरी होते. यावेळी त्यांच्यामध्ये दारू पिऊन वाद झाला. या वादातून राजू याने लाकडी दांड्याने सुनीलाल मारहाण केली. यात डोक्यात जबरी घाव बसल्याने सुनीलचा जागीच मृत्यू झाला. करमाड पोलिसांनी शुक्रवारी (दि.१३) सकाळी याबाबत गुन्हा दाखल करत आरोपी राजू ऊर्फ नंदकुमार पवार याला ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.