छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसीमध्ये तीन महिन्यांपूर्वी (२२ एप्रिल) रात्री चोरट्यांनी एक एटीएम मशीन लंपास केले होते. त्याबाबत आता एक मोठी माहिती समोर येत आहे. हे मशीन परभणी जिल्ह्यातील एका विहिरीमध्ये सापडून आल्याची माहिती मिळत आहे. त्या एटीएम मशीनमधून पैसे काढल्यानंतर चोरट्यांनी हे एटीएम मशीन सेलू तालुक्यातील झोडगाव शिवारातील एका विहिरीत फेकून दिले होते. त्यावेळी एटीएममधून चोरट्यांनी ७ लाख ४६ हजार रुपयाची रोकड लंपास केली होती. तीन महिन्यात या आरोपींचा छडा आणि संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. एटीएम मशीन विहिरीतून बाहेर काढून जप्त करण्यात आले आहे.
नेमकं प्रकरण काय..?
संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव परिसरातील एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन होते. अज्ञात चोरट्यांनी ते एटीएम मशीन उचलून वाहनात टाकून चोरी केले होते. आरोपींनी सिडको परिसरातूनच एक टेम्पो चोरी केला होता आणि या टेम्पो मधूनच हे एटीएम मशीन घेऊन चोरटे पसार झाले होते. एटीएम चोरीचा गुन्हा घडल्यानंतर संभाजीनगर पोलिसांनी सूत्रे फिरवली आणि काही दिवसातच वैजापूर शिरूर पोलिसांनी विष्णू रामभाऊ आकात (रा. सातोना, ता. परतुर) व देवा सुभाष तावडे (रा. पुंडलिक नगर) या दोन आरोपींना पकडले होते. या दोन्ही आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला.
दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांनी सांगितले की त्यांचे साथीदार लक्ष्मण जाधव (रा. वांगी, जि. नांदेड), लकी सुभाष तावडे (रा. पुंडलिक नगर) व महेश लक्ष्मण आकात (रा. सातोरा) यांच्या मदतीने २२ एप्रिलला मध्यरात्री टेम्पोला दोरी व साखळी बांधून एटीएम मशीन नेले होते. एटीएम मशीन कापून त्यातील सात लाख ४६ हजार १०० रुपयाची रोकड लंपास केली होती. गुन्हा कबूल केल्यानंतर आरोपींनी कापलेले एटीएम मशीन परभणीच्या सेलू तालुक्यातील झोडगाव शिवारातील एका विहिरीत टाकल्याचे कबूल केले.
त्यानंतर संभाजीनगर पोलिसांनी थेट सेलू तालुक्यातील झोडगाव शिवारात जात विहिरीतून एटीएम मशीन बाहेर काढत ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण कारवाईत पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त नितीन बगाटे, सहाय्यक आयुक्त महेंद्र देशमुख, सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.