धाराशिवः शेताची स्थळपाहणी करुन अहवाल मंडळ अधिकारी यांच्यामार्फत तहसीलदार यांना सादर करण्यासाठी दलालामार्फत ४ हजार रुपयाची लाच घेणाऱ्या धाराशिव तालुक्यातील वाघोली सज्जाच्या तलाठ्यासह दलालास रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (दि.५) ही कारवाई केली. एसीबीच्या या कारवाईमुळे लाचखोर कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत एसीबीने दिलेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या वडिलांचे नावे असलेल्या शेतावरील कुळाचे नाव कमी करण्यासाठी तक्रारदार यांनी तहसील कार्यालय, धाराशीव येथे अर्ज दाखल केला होता. या अर्जावरुन तहसीलदार धाराशिव यांनी मंडळ अधिकारी तेर यांना अर्जदार यांचे अर्जावरुन स्थळपाहणी व पंचनामा करुन अहवाल सादर करण्याचे आदेशीत केले होते. त्यावरून तक्रारदार यांच्या शेताची स्थळपाहणी व पंचनामा करुन अहवाल मंडळ अधिकारी यांच्या मार्फत तहसीलदार यांना सादर करण्यासाठी वाघोली सज्जाचे तलाठी भूषण वशिष्ट चोबे (रा.शिरसाव, ता. परंडा) व त्यांचा खासगी लिपीक भारत शंकर मगर (रा. वाघोली) यांनी तक्रारदार यांना ५ हजा रुपयाची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार दिली होती.
त्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने सोमवारी वाघोली येथे तलाठी कार्यालयात पडताळणी केली. यावेळी तलाठी चोबे याने तक्रारदार यांच्या वडिलांच्या अर्जावरुन पंचनामा करुन स्थळपाहणी अहवाल सादर करण्यासाठी खासगी लिपीक मगर याच्यामार्फत पंचासमक्ष ५ हजार रुपयाची मागणी केली. यावेळी तडजोडीअंती ४ हजार रुपयाची लाच स्विकारण्याचे मान्य करून लाच स्विकारली. यावेळी एसीबीच्या पथकाकडून त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. यावेळी पोलिसांनी तलाठी चोबे याची अंगझडती घेतली असता ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ३० ग्रॅम वजनाचा चांदीचा कडा, एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल, तर खासगी लिपीकाकडे लाचेचे ४ हजार रुपये व त्या व्यतीरिक्त १ हजार ९० रुपये आढळून आले. एसीबीचे उपअधीक्षक सिध्दरा म्हेत्रे, पोलीस अंमलदार नेताजी अनपट, आशीष पाटील, नागेश शेरकर यांच्या पथकाने केली.








