पुणे : स्वारगेट बस स्थानकाच्या आवारात एका तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश डी. एस. देशमुख यांच्या न्यायालयात पीडितेची साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, घडलेला प्रसंग न्यायालयासमोर सांगताना तरुणी अत्यंत भावुक झाली आणि तिला रडू कोसळले. पीडितेची ही मानसिक अवस्था लक्षात घेऊन न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता या खटल्याची पुढील सुनावणी येत्या 5 डिसेंबर रोजी पार पडणार आहे.

या प्रकरणातील आरोपी दत्तात्रेय उर्फ दत्ता गाडे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे नोंदवलेले आहेत. ही संतापजनक घटना 25 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटेच्या सुमारास स्वारगेट एसटी स्टँडवर घडली होती. पीडित 26 वर्षीय तरुणी प्रवासासाठी स्थानकावर आली असता, आरोपीने तिला साताऱ्याला जाणारी बस दुसऱ्या बाजूला लागते असे सांगून फसवले. तरुणीची दिशाभूल करून त्याने तिला तिथे उभ्या असलेल्या एका बंद शिवशाही बसमध्ये नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास करत आरोपी दत्तात्रेय गाडे याला बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर जून 2026 मध्ये विशेष न्यायालयाकडून आरोपीवर दोषारोप निश्चित करण्यात आले. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी या खटल्यात एकूण 87 साक्षीदारांची आणि आरोपीविरुद्धच्या ठोस पुराव्यांची यादी न्यायालयात सादर केली आहे.

या प्रकरणाच्या न्यायालयीन कामकाजात ॲड. मिसर यांना ॲड. प्रथमेश शिंगणे, ॲड. राकेश सोनार आणि ॲड. राधिका नावंदर-जोशी हे मोलाचे सहकार्य करत आहेत. पीडित तरुणी सावरल्यानंतर पुढील तारखेला तिची उर्वरित साक्ष पूर्ण केली जाणार आहे.






