पुणे : जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या राजकारणात एक महत्त्वाची घडामोड घडली असून, भाजपचे स्थानिक नेते मयूरसिंह पाटील यांनी आपल्या मूळ पक्षात म्हणजेच काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला आहे. स्थानिक राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि दुधगंगा तालुका दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष असलेल्या मयूरसिंह पाटील यांचा हा निर्णय भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

पक्षाने मयूरसिंह पाटील यांच्यावर विश्वास दाखवत प्रवेशानंतर लगेचच त्यांच्याकडे इंदापूर तालुकाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. आगामी निवडणुका आणि स्थानिक आव्हाने लक्षात घेता, त्यांच्या दांडग्या राजकीय अनुभवाचा आणि जनसंपर्काचा वापर करून तालुक्यात पक्ष संघटना मजबूत करणे आणि कार्यकर्त्यांना एकत्र आणणे, हे मुख्य उद्दिष्ट काँग्रेसने ठेवले आहे. यामुळे इंदापूरच्या राजकारणात पाटील यांची भूमिका आता अधिक निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
मयूरसिंह पाटील यांना काँग्रेसचा मोठा राजकीय वारसा लाभला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांचे चुलत भाऊ आहेत, तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत शंकरराव पाटील हे त्यांचे चुलते होते. शंकरराव पाटील यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे 6 वेळा आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचे 2 वेळा प्रतिनिधित्व केले होते. आपल्या कुटुंबाचा 3 पिढ्यांचा काँग्रेसशी असलेला संबंध आणि वैचारिक जडणघडण लक्षात घेऊन आपण स्वगृही परतण्याचा निर्णय घेतल्याचे मयूरसिंह पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेसशी दीर्घकाळ निष्ठा असलेल्या या कुटुंबातील मयूरसिंह पाटील यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडून अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांना पाठिंबा दिला होता. निवडणुकीनंतर प्रवीण माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या पाठोपाठ मयूरसिंह पाटील यांनीही भाजपची वाट धरली होती. मात्र, आता भाजपला रामराम ठोकत त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे.






