बीड: बीड सायबर पोलीस स्टेशन येथे नियुक्तीस असलेले निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत गंगाधर कासले यांना विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी १७ रोजी आदेश काढून सेवेतून बडतर्फ केले. दरम्यान, कासले पुणे येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर बीड येथील एक पथक पुण्यात पोहोचले. त्यांनी कासले यास ताब्यात घेऊन शुक्रवारी दुपारी बीड येथे आणले. वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कासले यांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देऊन पैशांची मागणी करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना २३ मार्च रोजी निलंबित करण्यात आले होते.
चुकीचे व बेजबाबदार वक्तव्य
निलंबन कालावधीत त्याने निलंबनाविरुद्ध कायदेशीर मार्गाने अपील करणे अपेक्षित असताना कासलेंनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, इतर मंत्री, बीड जिल्ह्यातील व इतर आमदार, खासदार व पोलीस दलातील अधिकारी यांच्या विषयी बेताल व बेजबाबदार वक्तव्य करून त्याचे व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारीत केले.
पदास न शोभणारे वर्तन
पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले यांनी पदास न शोभणारे वर्तन केले आहे. त्यांनी केलेल्या चुकीच्या, बेताल व बेजबाबदार वक्तव्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाल्याने विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी १७ रोजी आदेश काढून सेवेतून बडतर्फ केले आहे.