लातूर: पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी आणि धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यामध्ये समोर आली आहे. येथे चक्क पोलीसच अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याने त्यातून जे घडले त्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. लातूरमधील उदगीरमध्ये अंधश्रद्धेचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क पोलीस ठाण्यातच पोलिसांनी बोकडाचा बळी दिला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
वर्षभरापूर्वी एका पोलीस अधिकाऱ्याने पोलीस ठाण्याचा पदभार घेतला. मात्र, कारभार हाती घेतल्यापासून पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघात आणि गंभीर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढत होते. या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने चक्क बोकडाचा बळी दिला. पोलीस ठाण्याच्या आवारातच बोकड आणि त्याला कापणारा कसाई आणून पोलिसाने बळी दिला आहे.
वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याऐवजी बोकडाचा बळी देण्याची कल्पना एका अधिकाऱ्याच्या सुपीक डोक्यातून बाहेर आली. त्यानुसार या वरिष्ठ अधिकाऱ्याने तीनच्या अधिकाऱ्यांवर बोकड आणण्याची आणि पुढील विधी पार पाडण्याची जबाबदारी सोपवली. अधिकाऱ्यांनी त्यानुसार तयारी सुरू केली. एका अधिकाऱ्याने एक बोकड आणि त्याला कापणारा कसाई यांना पोलिस ठाण्यात आणले आणि बोकड बळी दिला आहे. अंधश्रद्धेचा हा धक्कादायक प्रकार उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये घडला. आता पोलिसांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागलं आहे.