Suicide News: बीड: शनिवारी सकाळी बीड (Beed) तालुक्यातील माजरसुंबा गावाजवळ असलेल्या येमपुरे वस्ती येथे एक दुर्दैवी घटना घडली. येथील 55 वर्षीय शेतकरी बाबुराव विठ्ठल येमपुरे यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide ) केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून गावात शोककळा पसरली आहे.
स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाबुराव येमपुरे हे कुणबी जातीचे प्रमाणपत्र न मिळाल्याने अनेक दिवसांपासून तणावात होते. त्यांच्या कुटुंबातील काही नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले असताना, त्यांच्या मुलाच्या अर्जाला मात्र तहसील कार्यालयात वारंवार अडचणी येत होत्या. अनेक वेळा कार्यालयात फेऱ्या मारूनही अर्ज प्रलंबित राहिल्याने ते निराश झाले होते.
कुटुंबीयांनी सांगितले की, जातीच्या प्रमाणपत्राअभावी मुलाच्या शिक्षणावर आणि भविष्यातील नोकरीच्या संधींवर परिणाम होणार असल्याची चिंता बाबुराव यांना सतावत होती. आरक्षणाच्या लाभांपासून वंचित राहावे लागेल, या विचाराने ते मानसिक दबावाखाली होते. या नैराश्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा कुटुंबीयांचा दावा आहे.
घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी नेकनूर येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला, अशी माहिती नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी दिली.
या घटनेमुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, जातीच्या प्रमाणपत्रासाठी होणाऱ्या विलंबामुळे नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.







