नांदेड : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत महसूल सहायक पदाला शेतकऱ्याच्या पोरीने गवसणी घातली आहे. त्यामुळे आपल्या लेकीनं एमपीएससी परीक्षेत बाजी मारल्याने आई-वडिलांना आकाश ठेंगणे झाले आहे. पोरीने आई-वडिलांच्या कष्टाचं चीज केलं असल्याची भावना उमटून येत आहे. अनिता देशमुख या शेतकरी कन्येने महसूल सहायक या पदाला गवसणी घातली आहे. अनिताचे सर्वत्र कौतुक होत असून सर्वांच्या चेहऱ्यावर तिच्यामुळे हास्य फुलले आहे.
अनिताचे नांदेड जिल्ह्यातील मूदखेड तालुक्यातच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यानंतर तिने स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुणे गाठलं होतं. अखेर तिने केलेलं कष्ट फळले आहते. आई वडिलांचे नाव मोठं केलं आहे. म्हणूनच शेतकरी बापाने आपल्या लाडक्या लेकीची वाजत गाजत मिरवणूक काढलीय आहे. या मिरवणुकीची सद्या सर्वत्र चर्चा आहे.
अनिता सुभाष देशमुख हिची महसूल सहायकपदी निवड झाली असून 2023 मध्ये तिने एमपीएससी मार्फत महसूल सहायकपदासाठीची परीक्षा दिली होती. त्यामुळेच, आज महसूल सहायकपदी निवड झालेल्या लेकीची आई वडिलांनी वाजत गाजत मिरवणूक काढली आहे. अनिता देशमुख ही मूळ मुदखेड तालुक्यातील चिकाळा येथील रहिवासी असून सद्या ती आपल्या आई-वडिलांसोबत सांगवी भागातील गोपाळनगर येथे राहते. तिचे वडील सुभाष देशमुख हे अल्पभूधारक शेतकरी असून अनिताने पुण्यात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली होती. दरम्यान, नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात महसूल सहायक पदावर अनिताने बाजी मारली आहे.
निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच अनिता आज नांदेडमध्ये आली आहे. त्यावेळी आई वडिलांनी सांगवी ते गोपालनगर येथील निवास्थानापर्यंत ढोल-ताशाच्या गजरात तिची मिरवणूक काढली. ‘स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता प्रयत्न करत रहावे, यश नक्की मिळेल’, असा संदेश अनिता देशमुख हिने यावेळी दिला.