लातूर: मराठा आरक्षणासाठी आजपर्यंत शकडो तरूणांनी आत्महत्या केल्या. त्यातच आता लातूरमध्येही एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. मांजरा आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या वसतीगृहात एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. प्रदीप मते पाटील असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो बीएएमएसच्या प्रथम वर्गात शिक्षण घेत होता. बीड जिल्ह्यातील लोणी येथील गावाचा तो रहिवासी होता.
आत्महत्येपूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहीली होती. शुक्रवारी सकाळी सात वाजता त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आदल्या रात्री मराठा आरक्षण-राजकारण यावर त्याने मित्रांशी चर्चा केली होती. तसेच कुटुंबीयांशी फोन करून संवाद साधला. सकाळी त्याने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोबाबाईलवर स्टेस्टस ठेवले. तसेच #मराठा आरक्षण अशी चिठ्ठी लिहून ठेवली. लाईटचा त्रास होईल मी अभ्यास करणार आहे तू बाहेर बस असे त्याने मित्राला सांगितले. मित्र बाहेर जाताच त्याने दरवाजा आतून लाऊन घेतला आणि गळफास घेऊन आत्महत्या केली.
प्रदीपचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्व. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेला आहे. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याशी प्रदीपच्या कुटुंबीयांनी दूरध्वनीवरून संवाद साधला. प्रदीपच्या आत्महत्येविषयी माहिती दिली. मनोज जरांगे पाटील यांनी घटनेविषयी सहवेदना व्यक्त केल्या. आरक्षण मिळणार आहे. कोणीही असे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले.