छत्रपती संभाजीनगर : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विविध राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज निकाली काढण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत २८ नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव किशोर कुलकर्णी यांनी सांगितले.
या शिबिराचा लाभ अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, एसईबीसी यासारख्या राखीव प्रवर्गातील सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता अकरावी किंवा बारावी विज्ञान शाखेत प्रवेश असलेले विद्यार्थी, ज्यांना बारावी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावयाचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांना पदवीनंतर एम.बी.ए., एम.सीए.ए., एल.एल.बी. (तीन वर्ष), बी. एड. इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावयाचा आहे.
तंत्रनिकेत अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज केले आहेत व त्यांची प्रकरणे त्रुटी पूर्ततेअभावी प्रलंबित आहेत. अशा विद्यार्थ्यांची प्रकरणे निकाली काढण्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम २८ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. विद्यार्थी व पालकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव किशोर कुलकर्णी यांनी केले आहे.