बीड : जावयाची लग्नात घोड्यावरील मिरवणूक तर सर्वांनी पाहिली असेल, मात्र बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा गावात जावयाची अनोखी मिरवणूक काढली जाते. विडा गावात धुळवडीच्या दिवशी जावयाला गाढवावर बसवून संपूर्ण गावात मिरवणूक काढत जल्लोषात धुलिवंदन साजरी केली जाते. या मिरवणुकीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
या गावामध्ये ही परंपरा गेल्या १० दशकांपासून आहे. लाडक्या जावयाला गाढवावर बसवून डोल, ताशा, बँन्जो, डीजे वाजवत गावात मिरवत अख्खे गाव डीजेच्या तालावर नाचते. या परंपरेत आतापर्यंत तब्बल 90 जावयांना गाढवावरती बसून वाजत गाजत गावात मिरवले गेले आहे.
त्यामुळे धुळवड म्हटलं की या गावचे जावई गायब होतात. मात्र शेर असलेल्या जावयास मेहुणे मंडळी सव्वाशेर भेटतात आणि दाजीला शोधूनच काढतात. या शोध मोहिमेत गावातील महिला देखील सहभागी होतात आणि मग सुरू होते जावयाची गदर्भ स्वारी. यावर्षी गाढवावर स्वार होण्याचा मान शिंदी गावचे संतोष नवनाथ जाधव यांना मिळाला आहे. एकनाथ पवार यांचे ते लाडके जावई आहेत.
जावयाला सोन्याची आंगठी
या प्रथेमागचे कारण ग्रामस्थांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, ही परंपरा सुरू ठेवण्यासाठी आम्हाला जावई शोधायला अनेक अडचणी येतात. अनेकदा अपशब्दही वापरले जातात. ही परंपरा आम्हाला चालू ठेवायची आहे. अनेक जावई या प्रथेतून पळ काढतात. आम्ही गाढवावर बसून त्यांची मिरवणूक काढतो. त्यानंतर त्यांना मान पान, सन्मान दिला जातो, सोन्याची आंगठी दिली जाते, त्यांचा सत्कार देखील केला जातो असं येथिल ग्रामस्थानी सांगितले आहे.