जळकोट (लातूर) : ‘तू दिसायला चांगली नाहीस, आमच्यासोबत राहण्याची तुझी लायकी लायकी नाही, मी दुसरे लग्न केले आहे, तुला नांदायचे असेल तर घर घेण्यासाठी माहेरहून २० लाख रुपये घेऊन ये, तुला सवतीसोबत नांदावे लागेल, असे म्हणत एका नोकरदार पत्नीचा सैनिक पतीसह सासरच्या मंडळींनी छळ केल्याची घटना जळकोट तालुक्यातील तिरुका येथे घडली. याप्रकरणी सैनिक पतीसह सासरच्या सात जणांविरोधात छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुळच्या नांदेड जिल्ह्यातील माहेर असलेल्या पीडिता अनिता बळीराम गिर्धवाड (रा. तिरुका, ता. जळकोट, जि. लातूर) या सध्या रायगड जिल्ह्यातील सुधागड येथे शासकीय नोकरीला आहेत. त्यांचा विवाह २०१९ मध्ये तिरुका येथील सैनिक असलेले पती बळीराम रघुनाथ गिर्धवाड यांच्यासोबत झाला होता. सुरुवातीला दोघांचा संसार सुखाचा होता. यातून त्यांना एक मुलगी झाली.
सुटीच्या दिवशी त्या तिरुका येथे सासरी येतात. मागील दोन वर्षांपासून सासरच्या मंडळींनी त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. शारिरीक व्यंगावरून दुषणे देण्यास सुरुवात केली. माहेरहून २० लाख रुपये आणण्याची मागणी केली. मधल्या काळात सैनिक पती बळीराम गिर्घवाड यांनी नांदेड जिल्ह्यातील एका मुलीसोबत दुसरा विवाह केला. यामुळे तुला नांदायचे असेल तर माहेरहून २० लाख रुपये घेऊन ये आणि दोघी मिळून राहा, असे पती बळीराम याच्यासह सासरची मंडळी म्हणू लागली.
यातून अनिता यांचा शारिरीक व मानसिक छळ सुरू झाला. त्यांना पती कर्तव्याहून आल्यानंतर मारहाण, शिवीगाळ करीत होता. सततच्या या जाचाला कंटाळून अनिता गिर्धवाड यांनी जळकोट पोलिसांत धाव घेतली. घडलेली सर्व हकीकत पोलिसांना सांगितली. पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पती बळीराम गिर्धवाड याच्यासह सासरे, सासू, दीर, जाऊ, भाऊजय, तिचा पती अशा सात जणांविरोधात जळकोट पोलीस ठाण्यात गुरनं. १६१/२४ कलम ८५, ८२, ११५ (२), ३५१(२), ३५२, ३(५) भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.