जालना : जालन्यातील राजूर रोडवरील तुपेवाडी फाट्याजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. तुपेवाडी फाट्याजवळ एक चारचाकी विहिरीमध्ये कोसळली आहे. काळी-पिवळी जीप विहिरीत कोसळल्याने सहा जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या गाडीमध्ये 12 लोक असल्याची माहिती मिळत आहे. तर तीन जणांना विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यातून काही प्रवासी काळ्या- पिवळ्या चारचाकी गाडीतून राजूरच्या दिशेने निघाले होते. राजूरकडे जात असताना तुपेवाडी फाट्याजवळ आल्यानंतर हा अपघात झाला आहे. ही काळी-पिवळी जीप ब्रेक फेल झाल्याने रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. सदर विहीरीला कठडे नसल्याने जीप थेट विहिरीत कोसळली. जीप विहरीत कोसळल्याची माहिती मिळताच काही ग्रामस्थांनी तात्काळ त्या दिशेने धाव घेतली. गाडीत 12 ते 15 प्रवासी असल्याची माहिती आहे. सध्या ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
जीपमधून प्रवास करणारे अनेक प्रवासी पंढरपूर येथून वारी वरून आले होते. जालना येथून ते आपल्या गावाकडे निघाले होते. दरम्यान राजूर रोडवरील तुपेवाडी फाट्याजवळ चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगतच असलेल्या विहिरीत जाऊन ही जीप कोसळली. ग्रामस्थ आणि पोलिसांकडून गाडीतील प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत 6 मृतदेह सापडले असून तीन जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.