छत्रपती संभाजीनगर : राज्यातील पंधरा ठिकाणच्या शासकीय तंत्रनिकेनांमध्ये अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी दुसरी पाळी (शिफ्ट) सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठी सन २०२४-२५ करिता अल्पसंख्यांक विकास विभागाने सहा कोटी ९ लाख रुपयांचा निधी तंत्रशिक्षण संचालनालयाला वितरित केला आहे.
राज्यातील शासकीय तंत्रनिकेतन संस्थांमध्ये सिव्हिल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये, डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, मेटलर्जिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, माहिती तंत्रज्ञान, ड्रेस डिझाईन आणि गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग यासह विविध विषयातील पदविका अभ्यासक्रम चालविले जातात. सर्व शासकीय तंत्रनिकेतन संस्था एका पाळीत चालतात.
परंतु, शासनाने विशेष बाब म्हणून अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी काही तंत्रनिकेतनमध्ये दुसरी पाळी सुरू करण्याचा निर्णय घेतला.आतापर्यंत ठाणे, सोलापूर, जळगाव, नांदेड, यवतमाळ, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नाागिरी, कराड, ब्रम्हपुरी, जालना, अंबड, पुणे, लातूर आणि हिंगोली विद्यार्थ्यांसाठी येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अशा दुसरी शिफ्ट पद्धतीने अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी दुसरी पाळी सुरू करण्यात आलेली आहे. सन २०२४-२५ मध्ये या दुसरी पाळीसाठी वेतन व इतर उदिष्टांकरिता ३४ कोटी ७० लाख रुपये इतकी अर्थसंकल्पिय तरतूद करण्यात आली असून त्यातील ६ कोटी ९ लाख रुपये तंत्रशिक्षण संचालनालयाला वितरित करण्यास अल्पसंख्यांक विभागाने मान्यता दिली आहे.
निधीच्या मर्यादेत खर्च करा
या योजनेअंतर्गत अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येऊन त्याचा तपशील वेळोवेळी अल्पसंख्यांक विकास विभागास सादर करावा. तसेच सदर अनुदान ज्या प्रयोजनासाठी मंजूर करण्यात आले आहे, त्याच प्रयोजनासाठी खर्च करण्यात यावे व खर्च मंजूर केलेल्या निधीच्या मर्यादेत ठेवावा, अशी सूचना अल्पसंख्यांक विकास विभागाने तंत्रशिक्षण विभागाला केली आहे.