लातूर, ता. 23 : “साहेब, माझ्याजवळ आता काहीच उरलं नाही… लै नुकसान झालंय, काहीतरी करा…” अशा शब्दांत एका शेतकऱ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती देताना शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या शेतकऱ्याला धीर देत मायेने छातीशी कवटाळले. “काळजी करू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,” असा आधार त्यांनी दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी लातूर जिल्ह्यातील जाऊ गावाला सकाळी ११च्या सुमारास भेट दिली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची आणि दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली.

मुख्यमंत्री गावात दाखल होताच स्थानिक शेतकऱ्यांनी दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती त्यांच्यासमोर मांडली. कमी पावसामुळे पिके आली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पाऊस न झाल्याने दुबार पेरणी करूनही पीक उगवले नाही. काही शेतकऱ्यांची पिके उगवली; मात्र त्यानंतर झालेल्या पावसामुळे ती जळून गेली, अशी व्यथा शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली.

यावेळी एका शेतकऱ्याने आपली परिस्थिती सांगताना भावनिक होत मदतीची मागणी केली. त्याची व्यथा ऐकल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याला धीर दिला. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी लवकरात लवकर भरीव आणि ठोस मदत दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.







