लोणी काळभोर, ता. 23 : गौरी-गणपतीसाठी बीड जिल्ह्यातील माहेरी गेलेल्या महिलेचे पुण्याकडे परतताना बसप्रवासात सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उरुळी कांचन येथे चार अनोळखी महिला बसमध्ये चढल्यानंतर काही वेळातच बॅगेतील लहान पर्समधून दागिने असलेला स्टीलचा डबा गायब झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. चोरट्यांनी 8 तोळे सोने आणि 10 हजार रुपये किंमतीची चांदी असा चालू बाजारभावाप्रमाणे 12 लाखांहून अधिक रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

याप्रकरणी आश्विनी मोकिंद बादाडे (वय 32 , रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बादाडे या गौरी-गणपतीनिमित्त आपल्या कुटुंबासह बीड जिल्ह्यातील काडी वडगाव येथे १७ सप्टेंबर रोजी गेल्या होत्या. पाच दिवस गावाकडे राहिल्यानंतर 22 सप्टेंबर रोजी सकाळी त्या पुण्याकडे परतण्यासाठी निघाल्या. त्यांच्यासोबत सोन्या-चांदीचे दागिनेही होते.

किल्ले धारूर येथून इंदापूर आगाराच्या धारूर-स्वारगेट बसने त्या पुण्याकडे निघाल्या. केज, कळंब, येरमळा, बार्शी, कुर्डुवाडी, टेंभुर्णी आणि इंदापूर मार्गे बस दुपारी उरुळी कांचन येथे पोहोचली. यावेळी तीन ते चार अनोळखी महिला बसमध्ये चढल्या आणि फिर्यादीच्या सीटजवळ येऊन उभ्या राहिल्या. बसमध्ये जागा उपलब्ध असतानाही या महिला फिर्यादीच्या सीटजवळच थांबल्या. त्यापैकी दोन महिला सीटजवळ खाली बसल्या, तर एक महिला पुढे आणि दुसरी मागे उभी राहिली होती. यातील एका महिलेने फिर्यादी बादाडे यांच्या पायाजवळ ठेवलेल्या बॅगेवर तोल गेल्याचे सांगत पडण्याचा बहाणा केला.

काही वेळानंतर फिर्यादी बादाडे कुंजीरवाडी येथील मराठे हॉस्पिटलसमोर बसमधून उतरल्या. घराजवळ असल्याने त्या कुटुंबासह पायी घरी गेल्या. काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास त्यांनी बॅग उघडली. त्यावेळी लहान पर्सची चैन उघडी असल्याचे दिसले. पर्स तपासली असता सोन्याचे दागिने ठेवलेला छोटा स्टीलचा डबा गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
दरम्यान, या डब्यात गंठण, नेकलेस, अंगठ्या, कानातील झुमके, सोन्याची चैन, बाळी, टॉप्स, सोन्याचे मणी तसेच चांदीचे पैजण असा ऐवज चोरून नेला आहे. चोरीला गेलेल्या मुद्देमालाची किंमत चालू बाजारभावानुसार सुमारे 12 लाखांहून अधिक रुपये होत आहे. उरुळीकांचन ते कुंजीरवाडी या बसप्रवासादरम्यान हा प्रकार घडल्याचा संशय असून, तक्रारीतील वर्णनावरून संबंधित महिलांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या महिलांपैकी कोणी पुन्हा दिसल्यास ओळखू शकते, असेही फिर्यादी बादाडे यांनी पोलिसांना सांगितले आहे.
या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 – 3(5),303(2) प्रमाणे चार महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, बसमधील प्रवासादरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज, बसमधील हालचाली आणि संशयित महिलांचा शोध घेण्याच्या दृष्टीने तपास करण्यात येत आहे.







