पुणे : भारतीय जनता पक्षाने आगामी राजकीय रणधुमाळी आणि संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी विविध राज्यांतील प्रभारी व सहप्रभारींची नवी यादी प्रसिद्ध केली आहे. पक्षाने अनेक महत्त्वाच्या नेत्यांवर विविध राज्यांचे नियोजन व व्यवस्थापन करण्याची मोठी जबाबदारी सोपवली आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी वैजयंत जय पांडा यांची प्रमुख प्रभारी म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या मदतीसाठी अमित मालवीय, सदानंद शेर्ट तनावाडे आणि कमलजीत सहरावत यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे. या फेरबदलात महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांना देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाची धुरा देण्यात आली आहे.

दरम्यान, देशातील इतर प्रमुख राज्यांमध्येही पक्षाने महत्त्वाची पदे निश्चित केली आहेत:

हरियाणा आणि छत्तीसगड: माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे या दोन्ही राज्यांचे प्रभारीपद सोपवले गेले आहे.
दिल्ली: विनय सहस्रबुददे यांच्याकडे राजधानी दिल्लीची सूत्रे दिली असून जमयांग नामग्याल व दर्शना जरदोश सहप्रभारी असतील.
उत्तराखंड: राम माधव यांची प्रभारी म्हणून तर बांसुरी स्वराज यांची सहप्रभारी म्हणून निवड झाली आहे.
पश्चिम बंगाल आणि तेलंगणा: या दोन राज्यांचे काम सुनील बन्सल हे पाहणार आहेत.
राजस्थान: संजय भाटिया यांची मुख्य प्रभारीपदी वर्णी लागली असून, कविता पाटीदार आणि कुलजीत चहल हे सहप्रभारी म्हणून त्यांना सहकार्य करतील.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची पकड मजबूत करणे, स्थानिक नेतृत्वाला मार्गदर्शन करणे आणि संघटन तळागाळापर्यंत पोहोचवणे यासाठी ही नवी टीम महत्त्वाची भूमिका बजावेल. भाजपने घेतलेला हा निर्णय पक्षाच्या भविष्यातील रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग मानला जात आहे.







