राहुलकुमार अवचट

दौंड : दौंड तालुक्यातील विविध विकासकामांबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बरोबर सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली असून दौंड तालुक्यातील विविध विकास कामांबाबतबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दौंडचे आमदार ॲड. राहुल कुल यांनी निवेदन दिले आहे.

दौंड तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार व इतर कर्मचाऱ्यांच्या शासकीय निवासस्थान इमारतीच्या बांधकामास मंजुरी मिळणे, दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार उभारणीसाठी मौजे भांडगाव, पारगाव व स्वामी चिंचोली येथील शासकीय जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, तालुक्यातील भांडगाव, खडकी, देऊळगाव राजे, पारगाव आणि पाटस या गावांमध्ये ‘उपक्रीडा संकुल’ उभारण्यासाठी शासकीय जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून यावेळी झाल्या चर्चेतून दौंड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या सोयी- सुविधांसाठी हे सर्व प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागतील, असा विश्वास आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, दौंडमधील शेती आणि सिंचनाच्या प्रश्नांवर जलसंपदा मंत्र्यांसोबत चर्चा झाल्याचेही सांगण्यात आले. शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक पाणी मिळावे तसेच उपसा सिंचन योजनांशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर कार्यवाही व्हावी, यासाठी मागण्या मांडण्यात आल्या.
सध्याच्या पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सिंचनाचा मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे. राज्य सरकारकडून विविध भागातील पावसाची आणि पिकांच्या स्थितीची पाहणी तसेच मदतीसाठी प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, दौंड तालुक्यातील या विविध मागण्यांवर पुढील प्रशासकीय कार्यवाहीकडे आता लक्ष लागले आहे.







