राहुलकुमार अवचट

यवत: दौंड तालुक्यातील शेती, पाणी आणि दुष्काळी उपाययोजनांसंदर्भात दौंडचे आमदार राहुल कुल यांनी जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दौंड विधानसभा मतदारसंघाशी संबंधित जलसंपदा विभागातील प्रलंबित प्रश्न तसेच सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काचे पाणी मिळावे, तसेच परिसरातील उपसा सिंचन योजनांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले. सध्याच्या परिस्थितीत पाण्याचा प्रश्न गंभीर असून, शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

या भेटीत जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार राहुल कुल यांच्या विविध मागण्या गांभीर्याने ऐकून घेतल्या. संबंधित प्रश्नांवर लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे सकारात्मक आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.
दौंडच्या विकासासाठी तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार खंबीरपणे पाठीशी असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. जलसंपदा विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्यास तालुक्यातील शेती आणि सिंचन व्यवस्थेला त्याचा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या भेटीवेळी माजी आमदार संग्रामदादा थोपटे हे देखील उपस्थित होते.






