परभणी : परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यातील उमरथडी ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत जोरदार राडा झाल्याची बातमी समोर येत आहे. निधी वाटपावरुन झालेल्या या राड्यामध्ये सरपंचासह सरपंच पतीलाही मारहाण करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.तसेच या प्रकरणात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गंगाखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत व पालम तालुक्यातील उमरथडी येथे ग्रामपंचायतच्या झालेल्या ग्रामसभेत दोन गटातील राड्यात महिला सरपंचासह त्यांच्या पतीला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन्ही गटाकडून परस्परविरोधी तक्रारी करण्यात आल्या असून दोन्ही गटातील सहा जणाविरुद्ध गंगाखेड पोलीस स्टेशनवर अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवार (ता. १० सप्टेंबर) पालम तालुक्यातील उमरथडी येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. निधी वाटपावरून सरपंच महिला व विरोधी गटातील सदस्यांमध्ये कुरबुर होत शिवीगाळ करण्यात आली. विरोधी गटातील महिला सदस्यांच्या महिला समर्थकांनी सरपंच महिला संगीता अच्युतराव पाथरकर व त्यांचे पती अच्युतरावं पाथरकर यांना जिल्हा परिषद शाळा परिसरात झालेल्या ग्रामसभेत मारहाण केल्याची घटना घडली आहे.
महिलांची महिलांना केस धरून मारहाण..
या घटनेनंतर घराकडे जाणाऱ्या सरपंच महिलेला गावातील महिलांनी महिलांनी केस धरून मारहाण केली, घटनेनंतर उमरथंडी गावात काही काळ तणावं निर्माण झाला होता. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी सरपंच महिलेसह सरपंच पती व त्यांचे समर्थक गंगाखेड पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी दुसऱ्या गटातील महिला व पुरुषांनी ही सरपंचांविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे गाठल्याने गंगाखेड पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती.