छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. 6 महिन्यांच्या बाळासह महिला डॉक्टरनं गोदावरी नदी पात्रात उडी घेऊन आली जीवन यात्रा संपवली आहे. दोन तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर या महिला डॉक्टरचा मृतदेह सापडला आहे. परंतु, बाळाचा अद्याप शोध लागलेला नाही. या महिलेनं आत्महत्या का केली? याचं नेमकं कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. महिला डॉक्टरने 6 महिन्यांच्या बाळासह गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केली आहे. पूजा प्रभाकर व्हरकटे असे मृत महिलेचे नाव आहे. चांगतपुरी येथे जायचे आहे म्हणून पैठण शहरातून पूजा प्रभाकर व्हरकटे या ऑटो रिक्षामध्ये आपल्या 6 महिन्यांच्या बाळासह निघाल्या होत्या.
पाटेगाव पूल आल्यानंतर गोदावरी नदीचे पाणी पाहायचे आहे, असे म्हणत त्यांनी रिक्षा थांबवली अन् रिक्षातून उतरून बाळासह नदीत उडी घेतली. दोन तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर महिलेचा मृतदेह सापडला असून, मात्र बाळाचा शोध लागलेला नाही.