अहिल्यानगर : अहिल्यानगरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अहिल्यानगरच्या पाथर्डीत पती-पत्नीच्या वादातून पतीने पत्नीवर ऍसिड टाकून गंभीर जखमी केलेण्याची घटना घडली आहे. जखमी झालेल्या पत्नीवर पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारा सुरु आहेत. दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद होत आहेत. हा वाद टोकाला गेला आणि या वादातूनच पतीने भयानक कृत्य केले आहे. सोनाली दत्तात्रय भाळवणकर (वय २८) असे घटनेत जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दरम्यान रविवारी (३ नोव्हेंबर) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पती निलेश उर्फ चंद्रकांत रमेश पांडव (रा. धारूर जि. बीड) हा पत्नी राहत असलेल्या पाथर्डी शहरातील नाथनगर या घरी आला. त्यावेळी आरोपी पतीने पत्नीला उद्देशून ‘तू मला सोडून इकडे का निघून आली’ असे म्हणतच पांडव याने पत्नी सोनाली हिच्यावर बाटलीतील ॲसिड अंगावर टाकले. ऍसिड टाकल्याने सोनाली हिने आरडा ओरडा केली. यामुळे आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी महिलेची मदत केल्याने मोठा अनर्थ टळला.
सदर घटनेत महिला वीस टक्के भाजली गेली असून महिलेचा एक हात, मानेची बाजू व कमरेपासून खालचा भाग भाजला गेला आहे. सहा महिन्यापासून हे पती पत्नी विभक्त राहत होते. याचाच राग मनात धरून पती पांडव याने ॲसिड अंगावर टाकून गंभीर प्रकारे जखमी केले आहे. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी संशयित पाटील घटनास्थळावरून तात्काळ ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, राम सोनवणे, सुखदेव धोत्रे, गोपाळ ढवळे हे घटनास्थळी दाखल झाले.