छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वैजापुरातील शासकीय वस्तीगृहातील मुलींच्या जेवणात चक्क किडे आढळून आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमध्ये मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात देण्यात येणाऱ्या जेवणामध्ये किडे आढळून आले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या या मुलींनी जेवण न करता तहसील कार्यालय गाठून तहसीलदारांकडे याबाबत तक्रार केली आहे. ग्रामीण भागातील मागासवर्गीय मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी याकरिता शासनाने वस्तीगृह सुरू केले आहे, मात्र याच वस्तीगृहामध्ये देण्यात येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या जेवणात किडे निघाल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच मुलींना आहारामध्ये सडके फळं देण्यात येत असल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला आहे. यामुळे या मुलींच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
वारंवार तक्रार करून सुद्धा या प्रकरणाची कोणी गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे मुली आणि पालक संतप्त झाले आहेत. मुलींनी या प्रकरणात आता थेट तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली असून या संपूर्ण प्रकरणी आता समाज कल्याण विभाग काय कारवाई करणार? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.