बीड : शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरे सर्रासपणे फिरत असल्याचे दिसून येतात. अशाच मोकाट फोरणाऱ्या जनावरांचे आरोग्य धोक्यात आल्याचे बीडमध्ये चित्र पाहायला मिळत आहे. त्यात आता बिडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नगर पालिकेने मोकाट जनावरांना पकडून नगरपालिकेच्या कोंडवाड्यात ठेवले असतांना कोडवाड्यात पाच महिन्यांची गर्भवती असलेली गाय मृत झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या गायीचे शवविच्छेदन केल्यानंतर एक धक्कादायक उघड झाली आहे.
मोकाट जनावरे रस्त्यावरच फिरत असतात. शिवाय रस्त्यावरच बसलेले असतात. दरम्यान बीड शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी २५ जुलै २०२४ पासून मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी विशेष पथक नियुक्त केले आहे. या पथकाने जवळपास ५० मोकाट जनावरांना पकडून शहरातील खासबाग व नेहरूनगर भागातील कोंडवाड्यात ठेवले आहे. या कोंडवाड्यात असलेल्या एका गायीचा मृत्यू झाला असून तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण शोधण्यासाठी शवविच्छेदन करण्यात आले.
पोटात ४० किलो प्लास्टिक निघाले..
शवविच्छेदन केले असता गायीच्या पोटात वासरू अन् तब्बल ४० किलो प्लास्टिक निघाले आहे. तर या गायीचा मृत्यू प्लास्टिकमुळेच झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुधन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तर याविषयी डॉक्टरांनी शवविच्छेदन केल्यानंतर सर्व सॅम्पल छत्रपती संभाजीनगरच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल आल्यावरच मृत्यूचे कारण अधिकृतरीत्या समोर येणार आहे, असंही ते म्हणाले आहे.