हिंगोली : हिंगोली शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिक्षक विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना हिंगोलीत घडली आहे. हिंगोली शहरात खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणीसाठी आलेल्या एका सोळा वर्षे विद्यार्थ्याने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली आहे. क्लासमधील तीन शिक्षकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. किरण गजानन लोंढे (वय १६) असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुलाचे बारावीचे वर्ष असल्याने आई-वडिलांनी त्याचा खासगी क्लास लावलेला होता. कॉलेज संपल्यानंतर किरण क्लासला जायचा. दरम्यान या क्लासमधील शिक्षकांकडून किरणला त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून किरणने रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे. किरणने रात्री उशिरा कुटुंबीयांना फोन करत आपण आत्महत्या करत असल्याची माहिती दिली. या नंतर घाबरलेल्या नातेवाईकांनी याची माहिती पोलिसांना दिली. मात्र पोलीस शोध घेण्याआधीच किरणचा मृतदेह हिंगोली शहराच्या जवळ असलेल्या रेल्वे रुळावर सापडून आला.
सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?
किरणने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईट नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये कोचिंग क्लासेसमधील एक शिक्षक क्लासमधील मुलीसोबत शारीरिक सबंध ठेवत असून अनेक मुलींशी त्याने संबंध ठेवले आहेत. त्यात इतर दोन शिक्षकांचा देखील सहभाग असून त्यांना शिक्षा द्या. त्यांच्यामुळेच आपण आत्महत्या करत आहे, असे लिहिले आहे. या घटनेनंतर आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तरुणाच्या नातेवाईकांनी तक्रार दिल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.