जालना : जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत जादूटोणा केल्याचे कृत्य समोर आले आहे. जालन्यातील गोंदी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये बांगड्या, हळद- कुंक आणि बाहुली आढळून आली आहे. विद्यार्थ्यांनी वर्गातून बाहेर पळ काढला होता. या घटनेमुळं गावात एकच चर्चा रंगत असून विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली आहे. हा प्रकार शनिवारी घडला असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहीत अशी की, जालना जिल्ह्यातील गोंदी येथील जिल्हा परिषद शाळेतील वर्गात हा प्रकार शनिवारच्या दिवशी घडला आहे. एका वर्गात बांगड्या, वाहिलेले हळद कुंकू आणि बाहुली आढळून आली आहे. हा धक्कादायक प्रकार पाहून नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी वर्गातून पळ काढला. तर या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सीसीटीव्हीही गेले चोरीला..
दरम्यान, गोंदी येथील जिल्हा परिषद शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे देखील काही दिवसापूर्वीच चोरी गेल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी शालेय व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांनी जालन्यातील गोंदी पोलिसांना निवेदन दिले आहे. मात्र या प्रकरणी अद्याप कोणता गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.