हिंगोली : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या असल्या तरी राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांकडून हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. गादीवर देखील दगडफेक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीचे उद्या म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान निवडणुकीसाठी मागील दहा-पंधरा दिवसांपासून सुरु असलेला प्रचार आता संपला आहे. उमेदवार आता गाठीभेटींवर भर देत आहेत. दरम्यान सोमवारी (१८ नोव्हेंबर) सायंकाळी प्रचार थांबला अंडी नंतर रात्री उशिरापर्यंत काही उमेदवार हे घरी जात होते. याच दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारावर हल्ला झाल्याची घटना हिंगोलीमध्ये घडली आहे.
उमेदवार जखमी..
हिंगोली कळमनुरी राष्ट्रीय महामार्गावरील सेल्सुरा फाटा येथे ही घटना घडली आहे. या हल्ल्यात उमेदवार दिलीप मस्के हे जखमी झाले आहेत. दरम्यान मस्के यांना तातडीने हिंगोलीच्या खाजगी रुग्णालयातून पुढील उपचारासाठी नांदेडला पाठवण्यात आले आहे. या घटनेचा वंचित बहुजन आघाडीने निषेध केला आहे. हल्ला करणाऱ्या आरोपी विरोधात तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी वंचितच्या कार्यकर्त्यांनी केली.