बीड : बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यात सद्या आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असून त्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरु केली आहे. ही यात्रा मंगळवारी माजलगावात आयोजित करण्यात आली होती. यानिमित्त अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर शहरातील मुख्य रस्त्यावर व राष्ट्रीय महामार्गावर विनापरवाना सगळीकडे लावण्यात आले होते. यातीलच धरणाच्या कमानीजवळ लावलेले एक बॅनर काढत असताना वीज वाहक तारेला बॅनरचा स्पर्श झाल्याने एका युवकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना रात्री घडली. गौतम सरपते (रा. केसापुरी) असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
परवानगीविना लावले बॅनर..
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा माजलगावात आली होती. त्या निमित्ताने मंगलनाथ मैदान या ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने शहरात सगळीकडे बॅनर लावण्यात आले होते. निवडणुका तोंडावर असल्यामुळे राष्ट्रवादीच्या अनेक इच्छुक उमेदवारांनी स्वागताचे बॅनर सिंदफणा नदी पात्र ते केसापुरी कॅम्पपर्यंत लावले होते. 5 किमीपर्यंत लावण्यात आलेल्या बॅनरमुळे शहरातून चालणे कठीण झाले होते.
या लावण्यात आलेल्या बॅनरला माजलगाव नगरपालिका व राष्ट्रीय महामार्गाकडून कसल्याच प्रकारची परवानगी घेतली नव्हती. बाजार समितीचे सभापती यांनी धरणाच्या कमानीजवळ त्यांचे स्वतःचे बॅनर लावले होते. हे बॅनर देखील विनापरवानगी लावण्यात आले होते. काल रात्री 11 वाजता हे बॅनर काढत असताना बॅनरचा स्पर्श वीज वाहक तारेस झाल्याने विजेचा धक्का लागून गौतम हरपते या 25 वर्षाच्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.