हिंगोली : हिंगोलीतील आरोग्य यंत्रणेचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना भर थंडीत जमिनीवर झोपवल्या गेले आहे. 13 डिसेंबर रोजी कुटुंब कल्याण योजना शिबिरात महिलांना थंडीच्या काळात थेट जमिनीवर झोपावे लागले. थंडगार फरशीवर महिलांना झोपण्याची व्यवस्था करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. शस्त्रक्रियेनंतर झोपण्यासाठी रुग्णालयात कॉट उपलब्ध नसल्याने महिलांना जमिनीवर झोपण्याची वेळ आल्याचे बोलले जात आहे. कळमनुरी तालुक्यातील बाळापूर ग्रामीण रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. याविषयीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोग्य यंत्रणेचे चांगलेच धाबे दणाणले आहे. त्यानंतर तात्काळ चूक दुरूस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण या घटनेवर आमदार संतोष बांगर यांच्या भूमिकेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
नेमकं काय घडलं?
काल शुक्रवारी ग्रामीण भागातील महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण बेड नसल्याने यातील 43 महिलांना थेट फरशीवर झोपवण्यात आले. ऐन थंडीच्या कडाक्यामध्ये महिलांना फरशीवर झोपावे लागले. आरोग्य यंत्रणेचा गलथानपणा समोर आला आहे. या सर्व घटनेनंतर नागरिकांनी आरोग्य खात्यावर चांगलाच रोष व्यक्त केला आहे. शस्त्रक्रियेनंतर स्वच्छेतेबाबतही काळजी न घेतल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. पण यंत्रणा हालली नाही. पण जेव्हा याविषयीचे व्हिडीओ समोर आले तेव्हा, त्यावेळी यंत्रणा खडबडून जागी झाली. या बेजबाबदारपणामुळे रुग्णालयावर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
नातेवाईकांच्या डोळ्यात पाणी..
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया झाल्यानंतर तब्बल 43 महिलांना जमिनीवरती झोपवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. आता महिलांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महिलांच्या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता, त्यावेळी नातेवाईकांना त्यांचे अश्रू लपवता आले नाही. पण यंत्रणेला मात्र सुरुवातीला कसलाच पाझर फुटला नाही. वृत्त समोर आल्यानंतर यंत्रणा खळबळून जागी झाली.
यंत्रणेचे धाबे दणाणले, तात्काळ चुक सुधारली..
बाळापुर घटनेनंतर आरोग्य विभाग खड़बडून जागा झाला आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांसह जिल्ह्याच पथक बाळापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल घडलेल्या घटनेनंतर अधिकचे 20 बेड वाढवणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक नितिन तडस यांनी दिली आहे.
संजय बांगर नेमके काय म्हणाले?
आखाडा बाळापूर येथे घडलेला प्रकार धक्कादायक नाही. त्यात आरोग्य विभागाने कोणताही हलगर्जीपणा केला नाही, अशी प्रतिक्रिया आमदार संतोष बांगर यांनी दिली. येथील आरोग्य केंद्राला, रुग्णालया आपण अनेकदा भेट दिली. महिलांची संख्या जास्त होती आणि वेळ कमी असल्याने जमिनीवर गाद्या टाकून महिलांची सोय करण्यात आल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यांच्या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.