छत्रपती संभाजीनगर: शिवसेनेतील (ठाकरे गट) ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्यात अंतर्गत मतभेद असल्याची नेहमी चर्चा असते. याचा फायदा घेत खैरे यांना गोंजारत आपल्याकडे खेचण्याचा आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आणखी एक हादरा देण्यासाठी शिवसेनेची यंत्रणा कामाला लागल्याचे समजते. छत्रपती संभाजीनगरात शिवसेनेची मोठी ताकद म्हणून खैरे यांचा नावलौकिक आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यभरातील अनेक नेत्यांनी ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करत एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर याचे प्रमाण वाढतच गेले. काही भागांतील ज्येष्ठ नेते ठाकरेंसोबत ठामपणे उभे राहिले. शिवसेनेच्या (ठाकरे गट) वरिष्ठ नेत्यांमधील वादाचा फटका पक्षाला बसल्याची चर्चा राजकीय गोटात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकतेच विधानसभा निवडणुकीत लाख मते घेतलेल्या राजू शिंदे यांनी शिवसेनेला (ठाकरे गट) “जय महाराष्ट्र’ केला. तत्पूर्वी वरिष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले. खैरेंकडून शिंदेंनाही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. राजू शिंदे यांच्या आरोपामुळे दानवे आणि खैरे यांच्यातील जुना संघर्ष चव्हाट्यावर आला. यावरून दोघांमध्ये पुन्हा एकदा खडाजंगी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत दानवे यांनी उमेदवारी मागितली होती. परंतु, ज्येष्ठ नेते असल्याचे सांगत ठाकरेंनी खैरे यांना उमेदवारी दिली. खैरे यांचा दारुण पराभव झाला, तर विधानसभा निवडणुकीत दानवे पराभूत झाले. हा वाद मिटवण्यासाठी मातोश्रीने मध्यस्थी केली.
हा अंतर्गत वाद अद्याप मिटलेला नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे या वादाचा फायदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घेण्याची रणनीती शिवसेनेकडून आखली जात आहे. शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि खासदार संदिपान भुमरे या दोन नेत्यांवर ही जबाबदारी देण्यात आल्याचे समजते, शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी खैरेंसाठी पक्षाचे दरवाजे उघडल्याने राज्याच्या राजकारणात चर्चाना उधाण आले आहे.
प्रदीर्घ राजकीय अनुभव आणि दांडगा जनसंपर्क शिवसेनेचे शाखाप्रमुख, नगरसेवक, महापालिकेत विरोधी पक्षनेता, दोन वेळा आमदार, चार वेळा खासदार, राज्यातील युती सरकारमध्ये मंत्री आणि शिवसेनेचे उपनेते आणि आता नेते असलेल्या खैरे यांची पक्षनिष्ठा, प्रदीर्घ राजकीय अनुभव आणि दांडगा जनसंपर्क आहे. आगामी काळात महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकी दरम्यान, आणखी काही पदाधिकारी, शिवसैनिक सेनेत आल्यास बळकटी येईल. त्यामुळे खैरे यांना खेचण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून सुरू आहेत.