जालना : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. त्यावर आता माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी भाष्य केलं आहे. समाजाला सर्वात जास्त फसवणारा बेईमान नेता हे शरद पवार असल्याची टीका भाजप आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली आहे. त्यांच्यासमोर शकुनी मामा देखील फेल आहे असं लोणीकर म्हणाले. परतूर येथील भाजप कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बबनराव लोणीकर बोलत होते.
दरम्यान, मराठा आणि ओबीसीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे भांडण लावत असल्याचा आरोप दे सुद्धा बबनराव लोणीकर यांनी केला. जातीपातीच्या बहकाव्यात येऊ नका, काँग्रेसवाले बेईमान आहेत, तर उद्धव ठाकरेंची शिवसेनावाले बेबनाव करणारे आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसलाही लोणीकरांनी शिव्यांची लाखोली वाहीली आहे.
‘या’ सरकारनं मराठा आरक्षण घालवलं
मराठा आरक्षण हे आपल्या सरकारनं दिल्याचे बबनराव लोणीकर म्हणाले. पण महाविकास आघाडीच्या सरकारनं ते आरक्षण घालवल्याचे लोणीकर म्हणाले. उद्धव ठाकरे हे खोटं पण रेटून बोलत आहेत. आम्ही सारे हिंदू एक आहोत. मोदींजींना सबका साथ सबका विकास हा नारा दिला आहे. त्याप्रमाणे काम सुरु असल्याचे लोणीकर यावेळी म्हणाले.