बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून विरोधकांकडून सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. अशातच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करा, तसेच बंदुकी सोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो आहेत त्यांचे परवाने रद्द करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक प्रशांत बुरडे यांना दिले आहेत.
बीड जिल्ह्यातील काही नेत्यांचे बंदुकीतून गोळी झाडत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे निर्देश दिले आहेत. बंदुकीसह ज्यांचे-ज्यांचे फोटो आहेत, ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा. बंदुकीचे जे परवाने दिलेले आहेत, त्यांचा तातडीने फेरआढावा घ्या, असे निर्देश देवेंद्र फडणवीसांकडून देण्यात आले आहेत.
देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपींचा खून..; अंजली दमानिया
संतोष देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमानिया यांनी धक्कादायक आरोप केले आहेत. या प्रकरणात पकडले जात नसलेल्या 3 आरोपींचा खून झाल्याचा गंभीर आरोप अंजली दमानियांनी केला आहे. यासंदर्भात फोन आल्याचा दावा अंजली दमानियांनी केला आहे. दरम्यान यासंदर्भात पोलीसांना माहिती दिल्याचही अंजली दमानियांनी सांगितलं आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेत नाहीत? असा सवालही यावेळी अंजली दमानियांनी उपस्थिती केला आहे.
अंजली दमानिया बोगस आरोप करतात : संजय शिरसाट
अंजली दमानिया बोगस आरोप करत असतात. तुमच्याकडे महिती असेल तर पोलिसांना द्यावी, हत्या झाली तर त्यांच्ये मृतदेह कुठ आहेत सरकार तुमच्या पाठीशी उभ आहे. बेछूट आरोप करण्यामुळे हे सगळं बिघडत आहे, असं मंत्री संजय शिरसाट म्हणाले आहेत. तसेच आरोपींना तातडीने अटक केलं जाईल. 6 एजन्सी शोध घेत असून आरोपींवर कारवाई करताना कुणाचीही गैर केली जाणारं नाही, असंही संजय शिरसाट म्हणाले.