बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसून येत आहे. देशमुख यांची हत्या करणाऱ्या प्रमुख आरोपींपैकी एक आरोपी अद्याप फरार आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. तसेच दुसरीकडे विविध शहरात सर्वपक्षीय मोर्चे काढत संतोष देशमुख यांना न्याय देण्याची या मोर्चातून केली जात आहे. तर संतोष देशमुख यांच्या हत्येचा आणि खंडणी प्रकरणाचा थेट संबंध असल्यामुळे खंडणीप्रकणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करत त्याच्यावर मोक्का लावण्याची मागणी देखील विरोधकांसह देशमुख कुटुंबिय करत आहेत.
अशातच सोमवारी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आक्रमक पवित्र घेत पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. यावेळी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह बीडचे एसपी यांनी धनंजय देशमुख यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं आहे. देशमुख कुटुंबियांनी तपास यंत्रणेवर संशय व्यक्त केल्यामुळे जुनी एसआयटी बरखास्त करत नवीन एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.
मात्र, नवीन एसआयटीची स्थापना केल्यानंतर तात्काळ बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. महत्वाची बाब म्हणजे खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची 14 दिवसांची पोलिस कोठडी आज संपत असून त्याला आता केजमधील सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहेत. त्यामुळे कराडला बेल मिळणार की त्याची कोठडी वाढवली जाणार? तर्क वितर्क लावले जात असतानाच प्रशासनाने जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.
त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ केल्या जाणाऱ्या आंदोलनांची धार वाढण्याची शक्यता असल्याने आणि मनोज जरांगे पाटील यांच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 14 ते 28 जानेवारीपर्यंत जमावबंदी राहणार असल्याची माहिती मिळत आहे. हे आदेश आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. या आदेशामुळे जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना मोर्चे, निदर्शने किंवा आंदोलने करण्यासाठी परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही, याबाबतचे आदेश बीडचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्याकडून देण्यात आले आहेत.