छत्रपती संभाजीनगर : चंदनचोरांच्या टोळीने सुरक्षा रक्षकासह पर्यवेक्षकाला कंपनीच्या कॅबीनमध्ये कोंडून ठेवत आवारातील चंदनाचे झाड चोरुन नेल्याची धक्कादायक घटना ९ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास चिकलठाणा परिसरातील हर्मन फिनोकेम लिमीटेड कंपनीत घडली. प्रकरणात सुरक्षा विभागाचे पर्यवेक्षक संतोष फुलारे (४९, रा. दिपकनगर, हडको) यांनी फिर्याद दिली.
त्यानुसार फिर्यादी व सिक्युरिटी गार्ड दिपक बनसोडे असे दोघे कंपनीत काम करीत असताना पहाटे चार वाजेच्या सुमारास सात जणांचे चंदन चोरांचे टोळके कंपनीच्या भिंतीवरुन उड्या मारुन कंपनीत शिरले. त्यातील एक जण कंपनीच्या बाहेर नजर ठेवून होता. कंपनीत शिरलेल्या चोरट्यांनी फिर्यादीसह दिपक बनसोडे याला करवत, लोखंडी रॉड, लाकडी दांड्याचा आणि विटेचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर चोरट्यांनी दोघांना एका कॅबीनमध्ये कोंडून ठेवले व कंपनीच्या आवारातील चंदनाचे झाड तोडून नेले. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.