धाराशिव: धाराशिव शहरातील मुख्य भागातील ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवर शनिवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून दिवसाढवळ्या दरोडा घातला गेल्याने शहरात एकच खळबड उडाली आहे.
दरोडेखोरांनी ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेतील कर्मचाऱ्यांना बांधून ठेवत दरोडा घातला. यामध्ये सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल आणि सोने चोरून नेण्यात आले आहे. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. सीसीटीव्हीमध्ये एकूण चार आरोपी कैद झाले आहेत.
धाराशिव शहरात जिल्हा स्टेडियमच्या जवळ असलेल्या सुनील प्लाझा येथील ज्योती क्रांती को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड ही बँक दिवसाढवळ्या लुटण्यात आली आहे. घटना घडताच बँक कर्मचाऱ्यांनी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्याशी संपर्क साधला आणि सदर घडलेली घटना सांगितली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
अज्ञात पाच जणांनी ज्योती क्रांती या बँकेत प्रवेश केला, तेव्हा बँकेत दोन कर्मचारी उपस्थित होते. बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून कर्मचाऱ्यांना बांधून ठेवले आणि लाखो रुपयांसह सोने लुटले. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोरीला गेलेला मुद्देमाल नेमका किती आहे हे स्पष्ट झालेलं नाही. परंतु, ते दोन कोटी रुपयांच्या जवळपास असल्याचं सांगितलं जात आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावत बँक लुटल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.